गडहिंग्लज: देशात आज विकासाच्या नावाखाली निसर्गाचा मोठा ऱ्हास होत आहे. ४२०० कोटींचे प्रकल्प ९० हजार कोटींवर पोहोचत आहेत, हा विकास नसून विनाश आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे आता 'पॉलिटिकली कंट्रोल बोर्ड' झाले आहे," अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी सरकारी धोरणांवर कडक शब्दांत प्रहार केला. येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित कर्मवीर विठठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार’ मार्गदर्शन करताना त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई यांना ज्येष्ठ समाजसेविका सौ.क्रांतीदेवी कुराडे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्काराने’ शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख पंचवीस हजार रुपये देऊन सन्मानीत करण्यात आले. प्रारंभी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब नदाफ व पूजा पंडित यांनी सादर केलेल्या 'चलो बसाये नया नगर' आणि 'मानो तो मैं गंगा माँ हूँ' या चळवळगीतांनी झाली. संचालिका प्रा.सौ.बीनादेवी कुराडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मानपत्राचे वाचन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या मार्गदर्शनामध्ये मेधाताई पाटकर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कोणत्याही पुरस्काराची रक्कम स्वतःच्या खर्चासाठी कधीही घेतली नाही. आज सामाजिक मुल्ये जोपासण्याची खरी गरज आहे. 'एक गाव एक पाणवठा' आणि समाजवादी विचारांचे बाबा आढाव यांची प्रेरणादायी उदाहरणे दिली. सरकार १९४७ चा औद्योगिक कायदा बदलत असून, असंघटित क्षेत्र आज असुरक्षित असल्याचे परखड मत त्यांनी मांडले. निसर्गाचा होत असलेला ऱ्हास हा केवळ अर्थकारण आणि राजकारणाचा भाग आहे.
पाणी आणि धरणे: १९९४ मध्ये अमेरिकेने धरणे बांधणे बंद केले तसेच युरोपमध्ये ४००० हून अधिक धरणे निकामी केली गेली आहेत, याची आठवण त्यांनी करून दिली. नदी बचाव, देश बचाव' आणि 'नदीला वाहू द्या, तिला श्वास घेऊ द्या' असा कळकळीचा संदेश त्यांनी दिला. आजच्या स्मार्ट सिटीचे वास्तव सांगताना इंदोरसारख्या शहरात पाण्याच्या समस्येमुळे ५० जणांचा मृत्यू झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्थलांतरितांचे प्रश्न कोरोना काळात स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल न बघवणारे होते, ज्यासाठी त्यांनी उपोषणही केले होते. मनरेगाच्या ठिकाणी 'जय रामजीचा कायदा' हा कष्टकऱ्यांच्या मुळावर उठणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय करार: दावोस, ब्राझील आणि पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय करारांवर त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. देशात विकेंद्रित जल, आर्थिक आणि औद्योगिक नियोजनाची नितांत गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. सत्य, अहिंसा आणि समाजवादी लढा उभारण्यासाठी त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले. ईश्वर आणि अल्लाह एकच आहेत, असे सांगून त्यांनी धर्माच्या नावावर होणारी भांडणे थांबवण्याचे आवाहन केले. समाज उद्धारासाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. युवकांनी 'व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी'चे विद्यार्थी न होता मानवी आणि संवैधानिक अधिकारांसाठी लढले पाहिजे. अनेक प्रकल्पांच्या विस्थापितांचा प्रश्न आजही अधांतरिच असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. जवळ जवळ ५०हजार विस्थापितांच्या कुटुंबांचे पुनर्वसन केवळ कागदोपत्री झाले आहे याचा खेद व्यक्त करत आपण यांच्यासाठी नेहमी लढत राहु अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. तसेच कोल्हापूरच्या प्रकल्पग्रस्तांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या हक्काची जागा मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी ही त्यांनी यावेळी केली. संस्था अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी केलेल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे आणि संस्थेच्या रोजगारपूरक शिक्षण पद्धतीचेही मेधाताई पाटकर यांनी कौतुक केले. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपले अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या न्याय-हक्कासाठी लढणाऱ्या नेतृत्वांचा विशेष कॉम्रेड शिवाजी गुरव, हरी मिटके, शंकर पावले, सदानंद व्हनबट्टे, सचिन पावले, श्री खाडे व कार्यकर्त्यांचा सत्कार मेधाताई पाटकर यांच्या हस्ते करण्यात आला. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे गुणवंत प्राध्यापक पुरस्काराने डॉ.राहुल मगदूम व गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्काराने श्री नेताजी कांबळे यांना गौरविण्यात आले.
यावेळी प्रा भारती पवार आणि डॉ. राजन गवस, डॉ.राहुल मगदूम यांनी मनोगते व्यक्त केली. या सोहळ्यासाठी जे. बी. बारदेस्कर, प्राचार्य कल्याणराव पुजारी, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष श्री के. जी. पाटील, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, श्री एम. के. सुतार, बसवराज आजरी, प्रा.विश्वजित कुराडे यांच्यासह संस्थेचे अन्य मान्यवर, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध प्रकल्पांचे प्रकल्पग्रस्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे, प्रा. गौरव पाटील यांनी केले.