शिवराज महाविद्यालयात ‘दमसा’चे तीन दिवसीय साहित्य संमेलनाचा ग्रंथ दिंडीने उत्साहात प्रारंभ

KolhapurLive
गडहिंग्लज : शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या 81 व्या वाढदिवस वर्षाच्या औचित्य साधून येथील शिवराज विद्या संकुल व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ आज ग्रंथ दिंडीने उत्साहात करण्यात आला.

प्रारंभी शिवराज महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे उदघाटन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीचा प्रारंभ शिवराज महाविद्यालयातून करण्यात आला. शिवराज विद्या संकुलातील शिवराज इंग्लिश मीडियम च्या लहान विद्यार्थ्यांनी व संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या व शिवराजच्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.अत्याळ व करंबळी च्या वारकरी भजनी मंडळांनी टाळ, मृदंगाच्या निनादात या दिंडीमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम, चला हो चला वारकरी आले. यासह अन्य भजन गीतांच्या साथीने वाजत-गाजत ग्रंथ दिंडीत रंग भरला होता. सुरेल भजनाच्या साथीने वाजत-गाजत निघालेल्या ग्रंथदिंडीमध्ये यावेळी विद्यार्थ्यांनी ‘पाणी आडवा पाणी जिरवा,’ ‘गिरवू अक्षर होऊ साक्षर,’ ‘पर्यावरण वाचवा,’ ‘लेक लाडकी या घरची,’ ‘बेटी बचाव बेटी पढाव,’ ‘साक्षर जनता भूषण भारता,’ ‘एक पुस्तक अनेक विचार,’ ‘ग्रंथ हेच गुरु,’ ‘वाचनाने जीवन समृद्ध बनवा,’ ‘वाचा हो वाचा पुस्तक वाचा,’ ‘वाचाल तर वाचाल,..... यांसह अनेक या घोषणा फलकांनी व घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले. ही ग्रंथदिंडी शहरातील मुख्य बाजारपेठेतून संपूर्ण शहरातून महात्मा बसवेश्वर, साने गुरुजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच शहरातील मस्जिद व चर्चमध्ये पुष्पहार अर्पण करून दिंडी महाविद्यालयाकडे प्रयाण झाली. दिंडीची सांगता शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते करण्यात आली.

शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष श्री के.जी.पाटील, अॅड. दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा. बीनादेवी कुराडे, संचालक प्रा. विश्वजीत कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, इंग्लिश मीडियमचे प्राचार्य श्री ए. बी. पाटील, श्री प्रकाश तेलवेकर, प्रा.पौर्णिमा कुराडे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे स्थानिक संयोजक श्री विलास माळी, स्थानिक कमिटीचे प्रा. सुभाष कोरे, श्री रावसाहेब मुरगी, समन्वयक डॉ. अशोक मोरमारे, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, प्रा.विक्रम शिंदे, साहित्यिक दिनकर खवरे, डॉ.श्रद्धा पाटील, रेखा पोतदार, दीपा बंदी, सुरेश दास यांच्यासह नवोदित साहित्यिक, तालुका ग्रंथालय संघाचे पदाधिकारी,ब सदस्य, या परिसरातील साहित्यिक, कवी, बहुसंख्य साहित्य रसिक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.