वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं आहे. तिसऱ्या पर्वात दक्षिण अफ्रिकेने जेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी क्रिकेटला तिसरा चॅम्पियन मिळाला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केलं आणि जेतेपद आपल्या नावावर केलं आहे. या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 74 धावांची आघाडी होती. त्यामुळे हा सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाकडे झुकलेला होता. पण दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं. पण तळाच्या फलंदाजांनी झुंजार फलंदाजी करत दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं. त्यामुळे दुसऱ्या डावात हे आव्हान काही दक्षिण अफ्रिकेला काही गाठता येणार नाही असंच क्रिडाप्रेमींना वाटत होतं. कारण लॉर्ड्सची खेळपट्टीवर इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करणं खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. पण दक्षिण अफ्रिकेने असाध्य वाटणारी गोष्ट सत्यात उतरवून दाखवली. दक्षिण अफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के बसले होते. मात्र इतक्या मोठ्या धक्क्यानंतर एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी झुंजार खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे विजयश्री जवळ आला. तिसऱ्या दिवशीच दक्षिण अफ्रिकेने 2 बाद 213 धावांची खेळी केली होती. चौथ्या दिवशी फक्त 69 धावांची गरज होती आणि हा विजय दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात असेल. झालंही तसंच.. दुसऱ्या दिवशी तीन विकेट गमवून दिलेलं लक्ष्य गाठलं.