शिवराज महाविद्यालयात बी.बी.ए., बी.सी.ए.प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु

KolhapurLive

गडहिंग्लज :नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या बदलांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल केल्यास आपले भवितव्य उज्वल होऊ शकते असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये बारावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मागील वर्षापासून बी.बी.ए., बी.सी.ए. या व्यावसायिक कोर्सेसचा समावेश शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असणाऱ्या ‘ऑल इंडीया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ या अंतर्गत करण्यात आलेला आहे. सर्वोकृष्ठ अभ्यासक्रम असलेल्या या कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. या प्रवेश परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आमचे मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा फॉर्म मोफत भरण्याची व्यवस्था व अन्य मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरी बारावी पास अथवा बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आमच्या या मार्गदर्शन केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहनही सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, समन्वयक प्रा.आझाद पटेल, बी.सी.ए.विभाग प्रमुख प्रा.के.एस.देसाई, बी.बी.ए.विभाग प्रमुख प्रा.आर.डी.कमते, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, पी.आर.ओ. प्रा. विक्रम शिंदे, प्रा.बी.एस.पठाण, श्री मिल्टन नोरेंज आदी उपस्थित होते.