गडहिंग्लज : जगण्याचे तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि आंनदी जीवन जगण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. वाचनाने माणूस खऱ्याअर्थी घडतो. वाचनाने माणूस त्याच्या जीवनात समृद्ध होतो. यासाठी विविधांगी वाचन करणे काळाची गरज आहे. हे जगणे अधिक सुंदर होण्यासाठी तसेच जीवनातील खरा अर्थ शोधण्यासाठी आपण मनापासून वाचन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा.पी.डी.पाटील यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात ग्रंथालय, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विभाग, वाड्मय मंडळ यांच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत ‘वाचन पंधरवडा’ कार्यक्रमात ‘वाचन कौशल्ये’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी कुंडीतील रोपाला मान्यवरांच्या हस्ते पाणी करण्यात आले. पुस्तकाच्या सानिध्यात राहून आपण आयुष्य घडविले पाहिजे. या देशातील अनेक थोर व्यक्तिमत्वे होऊन गेलीत त्यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी आणि आपण कसे घडलो याचा परिपाक चरित्र आणि आत्मचरित्राच्या माध्यमातून पुढे आला आहे. तो समजून घेण्यासाठी पुस्तके वाचलीच पाहिजे असे त्यांनी सांगितले. आज तर नव्या पिढीला वाचनाची खरी गरज आहे. आपल्या करिअरला बळकटी देण्यासाठी आपले जीवन समृद्ध करण्यासाठी पुस्तकांचे वाचन करणे जरुरीचे आहे. आपला वैज्ञानिक दृष्टीकोन बदलण्यासाठी विज्ञानाची पुस्तके देखील वाचून आज जे थोतांड माजले जात आहे ते तपासून घेण्याची गरज असल्याचे प्रा.पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी वाचन चळवळ ही रुजली पाहिजे. विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे तरच तो जीवनात यशस्वी होईल. वाचन हे माणसाच्या जगण्याला खऱ्याअर्थी दिशा देण्याचे कार्य करते. पुस्तक हेच माणसाला आयुष्याची शिधा देण्याचे मौलिक कार्य करत आहे याची प्रचिती आम्हाला आली आहे. याच शिवराज कॉलेज महाविद्यालयात प्रा.बन्ने सर, डॉ.गोकाककर सर, वडील बंधू प्रा.कुराडे सर यांच्यासारखी दिग्गज माणसे ही आमची आदर्श व्यक्तिमत्वे आहेत. त्यांनी आपल्या वाचनातून आणि लेखनातून आम्हाला घडविले हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. शासन ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे आहे. आजच्या नव्या पिढीने वाचनाच्या या चळवळीत सहभागी होऊन आपले आयुष्य घडवावे असे आवाहन डॉ.कुराडे यांनी केले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास क्रांती ग्रुपचे श्री पाटील सर, डॉ.मनमोहन राजे, डॉ.एन.बी.इकिले, डॉ.एस.डी.सावंत यांच्या अन्य प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वागत पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. प्रास्ताविक ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे यांनी केले तर आभार डॉ. ए.जी.हारदारे यांनी मानले.