५६ इंच आता मातीचा रिकामा खोका…संजय राऊत यांचा मोदींवर हल्ला

KolhapurLive

महाविकास आघाडीकडून शुक्रवारी मुंबई विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या मेळाव्यात सर्वांच्या टीकेचे लक्ष भाजप होते. या मेळाव्यात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी यांची ५६ इंच छात्री आता मातीचा रिकामा खोका झाला आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी केला.

मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे म्हणाले तीन बॉल्स आणि ९ रन पाहिजे. १८ धावा. षण्मुखानंद आमचं वानखेडे स्टेडियम. आमचे सर्व सामने याच मैदानात होतात. प्रेक्षकही आमचेच आहेत. ताई माई अक्का… काय आलं नवीन…? ओपनिंग फलंदाजाचे भाषण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. ही वर्ल्डकपची टीम आहे. आपण एक कप जिंकला आहे. दिल्लीचा कप आपणच घेतला आहे. आता महाराष्ट्राचा सामनाही आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही.

आज वाजपेयींची पुण्यतिथी आहे. आताचा भाजप बनावट आणि बोगस भाजप आहे. चोरांचा आहे. आम्ही ज्या ओरिजिनल भाजपसोबत काम केले. त्या वाजपेयींची पुण्यतिथी आहे. मला वाजपेयींच्या कवितेची ओळ आठवते. ती आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. ती मोदी शाह यांच्यासाठी नसेल. हार नही मानुंगा मै, हार नही मानुंगा मैं… आम्ही हार मारणार नाही. झुकणार नाही. हा महाराष्ट्र दिल्लीच्या हुकूमशाहीविरुद्ध झुकणार नाही. वाकणार नाही. तुम्हाला फोडून काढल्याशिवाय राहणार नाही. हा या मेळाव्याचा अर्थ आहे.

आपल्या वक्त्याने मोदींच्या ५६ इंचच्या छातीची आठवण केली. स्वत: मोदीच विसरले आहेत. ती छातीच नाही. तो मातीचा रिकामा खोका आहे. नुसती छाती जरी असती तर देशाची ही अवस्था झाली नसती. मोदी लालकिल्ल्यावर भाषण करत होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये जवानांचे बलिदान झाले. ३० दिवसांत २७ हल्ले झाले. १७ जवान शहीद झाले. अनेक घायाळ झाले. हे ५६ इंचाच्या छातीचे सरकार आहे. त्यांच्या छातीतील हवा आपण काढून टाकली आहे.

आपल्यात वाद नाही. भांडणे नाहीत. तसे असते तर लोकसभा जिंकलो नसतो. प्रयत्न खूप होतील. पण आमच्या ऐक्याला तडा जाणार नाही. एक तुकडाही उडणार नाही. हे वातावरण आहे, ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.