गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात मुलींसाठी संस्थेच्या मार्गदर्शक सौ.क्रांतीदेवी कुराडे यांच्या नांवाने शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना महाविद्यालयातील गोर-गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थिनीसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या या भागातील विद्यार्थिनीनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले आहे.
शिवराज महाविद्यालयात मुलींसाठी सौ.क्रांतीदेवी कुराडे शिष्यवृत्ती योजना सुरु करून संस्थेने या भागातील विद्यार्थिनीसाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून स्वयंम अर्थव्यवस्थेतून एकप्रकारचा आर्थिक आधार देण्याचा विधायक उपक्रम राबवीत आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी महाविद्यालयातील नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक डॉ.सुधीर मुंज, डॉ.नंदकुमार कोल्हापुरे, डॉ. आनंदा कुंभार तसेच शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी आपले एक महिन्याचे पेन्शन तसेच त्यांनी आपल्या कुटुंबातील सेवकांचा एक महिन्याचा पगार देऊन या शिष्यवृत्ती योजनेला भक्कम आर्थिक सहाय्य दिले आहे. सदरच्या शिष्यवृत्तीचा लाभ दरवर्षी देण्यात येणार आहे. तरी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीनी या योजनेसाठी रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर व प्रा.विक्रम शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष संपर्क साधून या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा.