विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेऊन स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होणे आवश्यक आहे.

KolhapurLive

गडहिंग्लज : जीवनात कोणतीही गोष्ट यशस्वी करणे अशक्य नाही. त्यासाठी आपण कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. स्वत:वर विश्वास ठेवून सातत्याने अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करण्यासाठी संधी आहेत. या संधीच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होणे शक्य आहे. असे प्रतिपादन यु.पी.एस.सी.च्या आय.ए.एस. परीक्षेतून देशात ३१० वा क्रमांक पटकाविलेल्या कु.वृषाली संतराम कांबळे यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागाच्यावतीने आयोजित सत्कार व शुभेच्छा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी कुंडीतील रोपाला पाणी मान्यवरांच्या हस्ते घालण्यात आले. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. नॅक समन्वयक प्रा.किशोर आदाटे यांनी प्रमुख सत्कारमूर्ती वृषाली कांबळे यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमात यु.पी.एस.सी.च्या आय.ए.एस. परीक्षेतून देशात ३१० वा  क्रमांक पटकाविल्याबद्दल कु.वृषाली संतराम कांबळे व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी वृषाली कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आई-वडिलांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि बार्टीच्या सहकार्यातून आपण खऱ्याअर्थी यशस्वी झालो असल्याचे सांगितले. यु.पी.एस.सी. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपण कशापद्धतीने अभ्यास केला. या परीक्षेसाठी कोण-कोणत्या घटकाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यासात सातत्य कसे ठेवले पाहिजे. मुलाखतीचे स्वरूप कसे असते. आपण कोणकोणती पुस्तके वाचली आहेत तसेच येणाऱ्या अडचणींवर आपण कशी मात करणे गरजेचे आहे. याबाबत त्यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे त्यांनी दिली. या कार्यक्रमात सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी शिवराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची कन्या यु.पी.एस.सी.मध्ये यशस्वी होते हे महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी मनामध्ये जिद्द घेऊन यशस्वी होणाऱ्या वृषाली कांबळे यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करून सत्कारमूर्ती वृषाली यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वृषाली यांच्या आई संगीता कांबळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमास कु.वृषाली यांचे वडील श्री संतराम कांबळे, त्यांचे कुटुंबीय, अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अशोक मोरमारे, डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. प्रा.एन.बी.एकिले यांनी मानले.