पर्यावरणाचा समतोल ठेवणे काळाची गरज आहे

KolhapurLive

गडहिंग्लज : पर्यावरण पाणी हा महत्वाचा घटक आहे. पर्यावरणाचा समतोल ठेवणे काळाची गरज आहे. पर्यावरणाला हानी पोहोचू नये, याची सर्वांनी वेळीच काळजी घेणे काळाची गरज आहे. हवा, पाणी, प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि निखळ व निर्मळ जीवन जगण्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक श्री संदीप चोडणकर यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालय व किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड कोल्हापूर यांच्या विद्यमाने आयोजित 'इको रेंजर्स' या उपक्रमांतर्गत 'पाण्याचे संवर्धन' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात किर्लोस्कर कंपनीचे सी.एस.आय.आर.प्रमुख श्री शरद आजगेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. आकांक्षा कडूकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण अभ्यासक संदीप बोडणकर पुढे म्हणाले- पाणी हे गरजेनुसार वापरून पुढच्या पिढीसाठी त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. आज पाण्याचे दुर्भीक्ष सर्वत्र जाणवू लागले आहे. पाण्याच्या शाश्वत विकास कसा असावा याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचे नियोजन हा देखील महत्वाचा विषय आहे त्याकडे गांभीयनि लक्ष देऊन कचरा विघटन करणे आवश्यक आहे. ग्रीन जॉब ही संकल्पना त्यांनी नव्याने मांडली. घरगुती कचरा विघटन प्रक्रियेत आपण सहभागी होऊन रोजगार निर्मिती कशा प्रकारे करू शकतो हे सर्वांना पटवून दिले. सद्या सर्व सजीवांवर पाणी तणाव किती प्रमाणात आहे. हे सांगून पाण्याची होणारी नासाडी वेळीच थांबविण्याचे आव्हान त्यांनी केले. पाण्याचे पुनर्वसन करून ठेवले पाहिजे शिवाय जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्व त्यांनी सविस्तरपणे सांगितले. निसर्गासोबत सुसंगत राहिले पाहिजे पाणी वाचविण्याची नैतिक जबाबदारी सर्वांनी पाळली पाहिजे तर आणि तरच आपण पर्यावरणपूरक जीवन जगल्याचे खऱ्याअर्थी समाधान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. गौरव पाटील, प्रा. मृणालिनी आसवले यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन वसुंधरा कमिटी प्रमुख प्रा. सुप्रिया मिसाळ यांनी केले तर आभार प्रा. स्वाती शिंदे यांनी मानले.