प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे.
५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.वास्तविक निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळालं ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते.
महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचं नाव मानानं घेतलं जातं असे. गेल्या चार पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वत: बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवली होती! आता त्यांच्या कन्या ह. भ. प. भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत.