हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद दहशतवादी हल्ल्यांची योजना आखण्यासाठी वेस्ट बँकमधील मशिदीच्या खाली कपाऊंड तयार करण्यात आलं होतं. या कंपाऊंडवर इस्रायलने रविवारी हवाई हल्ला केला आहे. दरम्यान, इस्रायलने गाझा पट्टीवर आपला हल्ला तीव्र करण्याची तयारी केली आहे. गाझा पट्टीतील मृतांची संख्या ४४६९ झाली आहे तर इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यात १४०० लोक मारले गेले आहे
इस्रायल संरक्षण दलाने काही फोटो शेअर केले आहेत. वेस्ट बँकमधील जेनिन निर्वासित शिबिरातील अल-अन्सार मशिदीच्या खाली बंकर असल्याचं या फोटोंमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यात अतिरेक्यांनी शस्त्रे कोठे ठेवली होती हे दाखविणारा आकृतीबंधही जारी केला. या ठिकाणी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात एक पॅलेस्टाईन नागरिकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत.
दरम्यान, ‘हमास’च्या हल्ल्यानंतर बंद केलेली इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवडय़ांनंतर शनिवारी खुली केली. त्यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा मदत सामुग्रीची वाहने गाझा पट्टीत दाखल झाली. तर सुमारे तीन हजार टन मदत साहित्याची आणखी २०० वाहने इजिप्तची सीमा ओलांडून गाझाकडे निघाली होती. मदत सामुग्रीच्या २० वाहनांना प्रथम इजिप्त सीमेवरून इस्रायलने वेढा दिलेल्या गाझा पट्टीत प्रवेश देण्यात आला असून या वाहनांमध्ये जीवरक्षक साहित्याचा समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे ही मदत सामुग्री गाझामधील मानवी संकटाच्या तीव्रतेच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचे मदत पथकांतील स्वयंसेवकांनी सांगितले.