उद्धव ठाकरे यांच्या सभा मंडपासमोरच हनुमान चालिसाचं पठण, राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक; राड्याची शक्यता

KolhapurLive

   अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पोहरादेवीचं दर्शन घेऊन त्यांनी काल विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणा जवळच काही अंतरावर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमरावतीत राडा होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे अमरावतीत आल्यास त्यांच्या सभेच्या ठिकाणापासून काही अंतरावर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्यांनी दिला आहे. राणा समर्थकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेभोवती मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राणा समर्थकांनी अमरावतीत हनुमान चालिसा पठणाचे पोस्टर्स लावले होते. हे पोस्टर्स ठाकरे समर्थकांनी फाडून टाकले

तसेच ठाकरे समर्थकांनी राणा दाम्पत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे हे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या अमरावतीतील स्वागताचे पोस्टर्स फाडले आहे. अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील हे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.