अजित पवार यांच्यावर अन्याय झाला का? जयंत पाटील यांची स्पष्ट भूमिका, म्हणाले…

KolhapurLive

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदाची नियुक्ती. शरद पवार यांनी आणखी काही नेत्यांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. पण यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांवर उधाण आलं आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अजित पवार यांच्यावर अन्याय झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

भाकरी परतवलेली नाही तर नवीन लोकांवर जबाबदारी दिलेली आहे. एक नवी टीमवर वेगवेगळ्या जबाबदारी देवून कामाला सुरुवात झालेली आहे. जे पक्ष ठरवेल तसंच वागायचं असतं. राष्ट्रीय स्तरावरुन जे आदेश येतील ते राज्याच्या विभागाने मान्य करायचेच असतात. तुम्ही किती म्हटलात तरी आम्ही सर्व एकमताने एकसंघ आहोत”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

‘अजित पवार यांच्यावर आधीच मोठी जबाबदारी’
“इथे कुठेही घराणेशाही दिसत नाहीय. कारण प्रफुल्ल पटेल यांनादेखील जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच महासचिव यांच्यावरही अन्य राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाला वाढवण्यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर आधीच मोठी जबाबादारी आहे. सर्वांच्या एकमताने याबाबतचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. याबाबत शंकेला कोणतंही कारण नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट म्हटलं आहे. तसेच “पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत”, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.