गडहिंग्लज : १ जानेवारी २०२४ तारखेवर आधारीत केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. याची अंमलबजावणी १ जूनपासून करण्यात आली असून यामध्ये नवीन मतदार, तृतीयपंथी, दिव्यांग आणि महिला मतदारांनी नाव नोंदणी, दुरूस्ती करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले आहे.
तहसिलदार ऋषिकेत शेळके यांच्या दालनात मतदार नोंदणी, दुरूस्ती संदर्भात आढावा घेवून तालुक्यातील कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली. १६ ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या दरम्यान १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून ऑनलाईन पध्दतीने नोंदणीचे काम सुरू असून त्यासाठी विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या या शिबिरात उपविभागातील दिव्यांग बांधव, तृतीयपंथीचे मतदार, महिलाचे नाव नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
घरोघरी मतदारांची भेट देऊन ८० वर्षावरील मतदारांची यादी तयार करणे, याबरोबर मृत मतदाराची नावे वगळणे, नवनवीन मतदार नोंदणी, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे स्वीकारणे, स्थलांतरीत कुटूंब, मतदाराचे अर्ज स्विकारणेबाबत सुचना केंद्रस्तराव देणे, तृतीयपंथी मतदारांचा शोध घेवून नोंदणी करणे आदी सूचनाही देण्यात आल्या. महाविद्यालयस्तरावर बैठक घेऊन मतदान नोंदणीसाठी निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती शेळके यांनी दिली.