२०१९ साली राज्यात निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार बनणार असल्याचं बोललं जात असतानाच अजित पवारांनी देवंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्याने खळबळ उडाली होती. त्या घटनेची अद्याप चर्चा थांबलेली नसून देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावर संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. “आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-एनसीपीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, फडणवीसांच्या या दाव्यावर संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत खोचक शब्दांत भाष्य केलं. “देवेंद्र फडणवीसांकडे कोणताही नवीन मुद्दा नाहीये. त्यांचं हे सरकार औटघटकेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याची दिलेली मुदत निम्मी संपली आहे. त्यामुळे १०० टक्के त्यांचं सरकार पडतंय. कदाचित ते झोपेत किंवा जागेपणी बडबडत असतील. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
शरद पवारांनी अमुक केलंय वगैरे ते बोलतायत. ठीक आहे ना. त्यात नवीन काय आहे? काय केलंय शरद पवारांनी? आमच्याशी बोलत होते वगैरे सांगताय. तुम्ही एक प्रयोग केला आणि तो फसला ही एका ओळीची गोष्ट आहे. तो प्रयोग तुमच्या अंगाशी आला. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.