बंगळुरूच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जातीभेद, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दलित तरुणाची आत्महत्या; व्हिडीओतून मांडली होती कैफियत

KolhapurLive

ऑफिसमध्ये जातीवरून छळ होत असल्याकारणाने एका ३५ वर्षीय दलित तरुणाने बंगळुरूत आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑफिसमधील अधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करून आल्यानंतर त्याच दिवशी त्याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्याने एक व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केला होता. त्यात त्याने आत्महत्येमागचे कारण सांगितले. 
विवेक राज असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव होतं. तो मुळचा उत्तर प्रदेशातील कप्तानगंज बस्तीचा रहिवासी होता. तर, बंगळुरूत लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत व्हिज्युअल मर्चेंडाइझर म्हणून काम करत होता. बंगळुरूच्या ब्रूकफिल्डमधील रिपब्लिक ऑफ व्हाइटरफिल्डमध्ये तो राहत होता.
यासंदर्भात माहिती देताना विवेकचे वडील राजकुमार म्हणाले की, “३ जून रोजी त्याने पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर आत्महत्येआधी त्याने मला दोन वेळा फोन केला. तो ज्या पद्धतीने परिस्थितीला तोंड देतोय याबद्दल त्याने काहीच सांगितलं नाही. त्याने नेहमीच्या गोष्टी आणि माझ्या तब्येतीबद्दल विचारले. माझा मुलगा माझ्यासाठी सर्वस्व होता”. वडिलांनी या मृत्यूसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

व्हाईटफिल्ड पोलिसांनी कलम ३४ (सामान्य हेतुने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) आणि ३०६(आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येआधी केलेल्या व्हिडीओमध्ये विवेक म्हणतो की, यापुढे मी लढण्यास असमर्थ आहे. काही सहकाऱ्यांकडून माझा छळ होत आहे. तसंच, मी काही मुद्दे मांडल्यामुळे मला त्रासही सहन करावा लागत आहे.

विवेकने आत्महत्येआधी केली होती पोलीस तक्रार

आत्महत्येआधी त्याने पोलिसांत दाखल केलेल्या पोलीस एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, कंपनीचे दोन वरिष्ठ अधिकारी जातीच्या आधारे भेदभाव करतात. त्यामुळे पोलिसांनी कलम ३(१)(कोणत्याही ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या सदस्याचा अपमान करणे), ३ (१)(एस) (शिविगाळ करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकने एचआरकडे जातीभेदाचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु,या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिले नाही.

कंपनीने काय म्हटलं?

दरम्यान, लाईफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने एका निवेदनात म्हटलं आहे क, आमच्या माजी कर्मचाऱ्याच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले. आमची प्रार्थना या सर्वात कठीण काळात त्याच्या मित्र आणि कुटुंबासोबत आहे. विवेकने आमच्या अंतर्गत प्रक्रियेद्वारे तक्रार नोंदवली होती आणि कंपनीच्या धोरणांनुसार संपूर्ण अंतर्गत तपासणी करण्यात आली होती, त्याबाबता विवेकला माहिती देऊन कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आणि पोलिसांकडून तपास केला जात असल्याने आम्ही त्यांच्या तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत.”

व्हिडीओत काय म्हटलं त्याने?

आत्महत्येआधी विवेकने व्हिडीओ पोस्ट केला होता. “मी लढण्यास अमसर्थ आहे. काही सहकाऱ्यांकडून माझा छळ होत आहे आणि काही मुद्दे मांडल्याबद्दल मला त्रासही सहन करावा लागला”, असं विवेकने म्हटलं होतं.