कल्याण : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून गेल्या काही दिवसात शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितल्याने शिंदे गटाची गोची झाली आहे. हा वाद सुरू असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनाउधाण आलं आहे. सुभाष भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार की भोईर-गायकवाड भेट हा शिंदे गटासाठी सूचक इशारा आहे? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात गेले काही दिवसापासून दररोज एक नवा वाद होत आहे. युतीत असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद होताना दिसून येत आहे. यातच अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे पिता-पुत्रांना कुठलीही मदत करायची नाही, असा ठरावही बैठक घेऊन मांडला होता. हा वाद सुरू असतानाच याच मतदारसंघात ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर याच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार सुभाष भोईर… असं लिहिलेले बॅनर्स लावण्यात आले होते.
तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचेही तीन दौरे झाले. हे सर्व सुरू असतानाच भावी खासदार म्हणून ज्यांचे कल्याणमध्ये बॅनर्स लागले त्या सुभाष भोईर यांनी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतली. गणपत गायकवाड यांचा काल वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर ही भेट त्यांनी घेतली. पण ही भेट केवळ सदिच्छा भेट राहिली नाही. दोन्ही नेत्यांनी बंददाराआड चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.