मुंबईसाठी नवखा गोलंदाज आकाश मधवालने ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. पीयुष चावलानेही अप्रतिम गोलंदाजी करून दोन विकेट्स घेतल्या. कुमार कार्तिकेयनंही दोन विकेट्स घेत मुंबईला विजयाच्या दिशेनं नेलं. तर बेहरनडॉर्फने हार्दिक पांड्याला माघारी पाठवत गुजरातला मोठा धक्का दिला. गुजरातसाठी डेविड मिलरने २६ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. मिलर बाद झाल्यानंतर राशिद खानने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तर इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी झाले.
रोहित शर्मा आणि ईशान किशनने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी करून मुंबईला चांगली सुरुवातकरून दिली. परंतु, राशिद खानच्या गोलंदाजीवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि मुंबईला मोठा धक्का बसला. त्यानंतर मैदानात उतरलेला नेहर वढेराही राशिदच्या गोलंदाजीचा शिकार झाला. परंतु, कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सूर्युकमार यादव पुन्हा एकदा तळपला आणि मुंबईच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. तसंच मुंबईचा नवखा फलंदाज विष्णू विनोदनेही अप्रतिम फलंदाजी केली.
मुंबईसाठी रोहित शर्मा (२९), ईशान किशन (३१), विष्णू विनोद (३०), नेहल वढेरा (१५), टीम डेव्हिड (५) धावा करून बाद झाला. पण त्यानंतर वानखेडे मैदानात सूर्यकुमार यादवचं वादळ आलं आणि मुंबईची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढली. सूर्यकुमारने ४९ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकार ठोकून १०३ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकात ५ विकेट्स गमावत २१८ धावांपर्यंत मजल मारली, त्यामुळे गुजराता विजयासाठी २१९ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.