नेसरी : हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी व माजी सरपंच विष्णू रामा पाटील (वय ६७) यांनी १० एचपी पॉवर ट्रेलर सुमारे दीड लाख रुपये किमतीचा चोरी झाल्याची फिर्याद नेसरी पोलीस ठाण्यात दिली. डोणेवाडी गावातील गट नंबर १५१ मध्ये पाटील यांच्या मालकीची शेती आहे. ६ मे रोजी सदर शेतात पावर ट्रेलर मशागतीकरीता नेला होता. विष्णू पाटील हे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मशागत करून पावर ट्रेलर शेजारी असणाऱ्या पुतण्या वसंत पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये लावून हडलगे गावी घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी पाटील- यांचा मुलगा प्रदीप गवत आणणेकरीता शेतात गेला असता पावर ट्रेलर लावलेल्या जागेवरच होता. ८ मे रोजी पाटील यांची सुन लता या शेतामध्ये गेल्या असता पावर ट्रेलर दिसून आला नाही. याची माहिती फोनवरून घरच्यांना दिली. पाटील यांनी अज्ञाता विरोधात चोरीची फिर्याद दिली. चोरीची माहिती देणाऱ्यास रोख रक्कम बक्षीस देण्याचे पाटील यांनी जाहीर केले आहे.