कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातही आता निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून स्थानिक पातळीवरील बैठकांना जोर आला आहे. दरम्यान, आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे अधिकृत जाहीर झाले असले तरीही जागावाटपात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
बुट कमिटीची स्थापना करणे, सदस्य नोंदणी करण्याचं काम अनिल देशमुख यांच्याकडे आलं आहे. सर्वांना सोबत घेऊन काम पूर्ण करणार असल्याचा विश्वास अनिल देशमुख यांनी बोलून दाखवला. तसच , विदर्भातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात जागावाटप कसे करणार याबाबतही त्यांनी भाष्य केलं.
“भंडारा, गोंदिया येथे प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काम करतोय. आम्ही सर्वच मतदारसंघात चाचपणी करतोय की कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादीने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवावी. विदर्भात चाचपणी सुरू असून मित्रपक्षाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. जी जागा राष्ट्रवादीला अनुकूल आहे त्या जागेबाबत मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. वर्धा आमच्यासाठी अनुकूल आहे. परंतु, महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांनाही विचारात घेतले जाणार आहे. ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहे तिथे तो उमेदवार दिला जाईल”, असं अनिल देशमुख म्हणाले.
प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात पक्षसंघटना उभी राहायला हवी याकरता आमची तयारी सुरू आहे. तसंच, कोणते विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला अनुकूल राहतील याची चाचपणी सुरू झाली आहे. चाचपणी झाल्यानंतर मित्रपक्षांशी चर्चा करून पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी निर्णय घेतील, असंही अनिल देशमुख म्हणाले.
अॅन्टिलियाचा स्फोटक प्रकरणाचा मास्टरमाईंड परमबीर सिंगच
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन राज्य शासनाने नुकतेच रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले की, “परमबीर यांच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आठ ते १० गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. खंडणी, कायद्याचा दुरुपयोग या सारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोरील स्फोटके प्रकरणातील परमबीर सिंग हेच मुख्य सूत्रधार आहेत. गृहमंत्री असताना परमबीर यांची खालच्या पदावर बदली करण्यात आली होती. तसेच या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातही परमबीर सिंग यांची मुख्य भूमिका होती, असे नमूद केले आहे. स्फोटके प्रकरणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकणातील आरोपी प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळताना परमबीर सिंग यांचा मुख्य सहभाग असातनाही त्यांना संरक्षण का देण्यात येत आहे, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले होते.”