“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नावालाच…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; भाजपावर टीकास्र!

KolhapurLive

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू झालेला असतानाच राज्याच्या काही भागांत दंगलसदृश्य तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप आता सुरू झाले आहेत. यासंदर्भात ठाकरे गटानं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच केंद्रातील मोदी सरकारवरही हल्लाबोल केला आहे. अकोला, नगर आणि त्र्यंबकेश्वरमधील घटनांचा हवाला देत “राज्यात मिंधे सरकार आल्यापासून दंगलींचे प्रमाण वाढले आहे.
“महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वाऱ्यावर आहेत आणि गृहमंत्री फडणवीस नावालाच आहेत असेच एकंदरीत दिसते. दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात घुसले आहेत. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते.

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील घटनेवर भूमिका

“काही मुस्लिम मंडळींनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून चादर चढवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षातील ‘दंगल-तणाव-भडकाव महामंडळा’ने यावर लगेच आपापले भोंगे वाजवून राजकीय ‘जनजागृती’चे कार्य हाती घेतले. प्रश्न धार्मिक भावनांचा आहे. अजमेर शरीफ दर्ग्यावर पंतप्रधानांपासून बरेच भाजप नेते श्रद्धेची चादर चढवीत असतात, पण ती त्यांची प्रतीके आहेत. हिंदू देवतांवर चादर चढविण्याच्या पद्धती नाहीत.महाराष्ट्रात धार्मिक सलोखा चांगल्या पद्धतीने निर्माण झाला असताना कोणाला तरी या सद्भावनेला चूड लावायची इच्छा दिसत आहे”, असं ठाकरे गटानं नमूद केलं आहे.

“भाजपा दंगली घडवणारा कारखाना”

राज्यात सध्या भडकविल्या जात असलेल्या दंगली राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्या जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. काही लोक आगीत तेल वगैरे ओतण्याचे काम करीत आहेत. त्यांचे चेहरे मी लवकरच बाहेर आणेन, असा इशारा गृहमंत्री श्री. फडणवीस यांनी दिला. पण त्यांचे बोलणे सध्या फोल ठरत आहे. भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून घेणारा व दंगली घडविणारा कारखाना आहे”, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

“शिवसेना फोडून राज्य केले जात आहे, त्याप्रमाणे समाज फोडून त्यांना निवडणुका लढवायच्या असाव्यात. भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणारे गारदी सभोवती वावरत आहेत.