गडहिंग्लज
केंद्र शासनाच्या पीएम श्री' योजनेत देशभरातील निवड झालेल्या ५१६ शाळामध्ये गडहिंग्लज नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै विद्यालयाची निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या निवडीबद्दल शाळेला केंद्र सरकारकडून १ कोटी ८८ लाखांचा निधी मिळणार आहे.
पीएम श्री (प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझींग इंडिया) योजनेअंतर्गत शासनस्तरीय समितीकडून शाळेची तपासणी करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक इतर सोयीसुविधा यांची तपासणी केली. विद्यालयाची गुणवत्ता वाढवण्यासाठी होणारे प्रयत्न याची नोंद घेण्यात आली. येथील विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग, बूट, सॉक्स, ओळखपत्र याचा पुरवठा नगरपालिकेतर्फे केला जातो. यासह वाहतूक, स्वच्छता आदी बाबींसाठीही पालिकेची आर्थिक मदत असते याची नोंद घेत ही निवड झाल्याचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी सांगितले. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत शाळेला ५ वर्षासाठी १ कोटी ८८ लाख इतका निधी उपलब्ध होणार आहे. यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, सायन्स लॅब, वाचनालय, आयसीटी सुविधा, क्रीडा आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. मुख्याधिकारी खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या अवंती पाटील, इरशाद मकानदार, मुख्याध्यापिका सुवर्णा पोवार आणि त्यांच्या सहकाऱ्यानी' यासाठी विशेष परिश्रम घेतले.