राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला दुसरा मोठा धक्का, ‘हा’ डॅशिंग अष्टपैलू खेळाडू आयपीएल मधून बाहेर

KolhapurLive

पंजाब किंग्जला बुधवारी संध्याकाळी आयपीएल २०२३चा दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे, मात्र या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावा संघाबाहेर आहे. अशाप्रकारे पंजाब किंग्जला हा दुसरा धक्का बसला आहे. यापूर्वी इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता.

पंजाब किंग्जचा युवा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावा दुखापतीमुळे आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला आहे. बुधवारी (५ एप्रिल) आयपीएलने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही अधिकृत माहिती दिली. पंजाब किंग्जने राज अंगद बावाच्या जागी अष्टपैलू गुरनूर सिंग ब्रारचा संघात समावेश केला आहे, संघाने २० लाख रुपये खर्च करून त्याला सामील केले आहे. डावखुरा फलंदाजी करणारा अष्टपैलू गुरनूर सिंगने डिसेंबर २०२२ मध्ये पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि १२०.२२च्या स्ट्राइक रेटने १०७ धावा केल्या आहेत, तर ३.८०च्या इकॉनॉमीसह ७ विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे, जॉनी बेअरस्टोला स्पर्धेपूर्वी आयपीएल २०२३ मधून बाहेर काढण्यात आले होते, तेव्हा पंजाब किंग्जनेही त्याच्या जागी संघाची घोषणा केली आहे. पंजाब किंग्जने ऑस्ट्रेलियाचा अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू आणि बिग बॅश लीग म्हणजेच बीबीएलच्या मागील हंगामाचा नायक मॅथ्यू शॉर्टला जोडले होते. शॉर्टचा हा पहिलाच आयपीएल मोसम आहे, पण त्याला पहिल्याच सामन्यात संधी मिळाली नाही. त्याने बीबीएलमध्ये सलामी करताना ४५८ धावा केल्या आणि ऑफ-स्पिनसह ११ विकेट्स घेतल्या आणि टूर्नामेंटच्या सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला.

पंजाब किंग्जने गेल्या हंगामातील मेगा लिलावात राज अंगद बावाला २ कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र, गेल्या मोसमात त्याला केवळ दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली. डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २०२२ अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात राज अंगद बावाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २५२ धावा करण्यासोबतच त्याने ९ विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे चालू मोसमातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने डकवर्थ लुईस पद्धतीनुसार कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. संघाला आपला दुसरा सामना बुधवारी गुवाहाटी येथे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचा आहे.