ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून काम बंद

KolhapurLive

गडहिंग्लज, ता. ५ प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी सोमवारपासून (ता. १०) काम बंद आंदोलन करणार आहेत. राज्यव्यापी आंदोलनात गडहिंग्लज तालुक्यातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. गडहिंग्लज तालुका ग्रामपंचायत कामगार संघटनेतर्फे (आयटक) गटविकास अधिकाऱ्यांना याबाबतचे 'निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व सुधारित राहणीमान भत्ता फरक मिळावा, जाचक आकृतीबंदाची अट रद्द करावी, पेन्शन लागू करावी, यावलकर समितीची शिफारस लागू करावी, जिल्हा परिषदेमध्ये वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांची मागील सेवा जोडावी आदी मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा लढा सुरु आहे. मागण्यांबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही नाही. त्यामुळे सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अधीक्षक तानाजी राणे यांनी निवेदन स्वीकारले. राज्य सरचिटणीस बबन पाटील, जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, सरचिटणीस सुरेश म्हकावे, खजिनदार रावजी कांबळे, सदस्य सुरेश मायनावर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.