म्यानमार सैन्याकडून एका गावावर एअर स्ट्राईक, लहान मुलं, पत्रकारांसह १०० जणांचा मृत्यू

KolhapurLive

म्यानमार सैन्याने मंगळवारी (११ एप्रिल) एका गावावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलं, पत्रकारांसह एकूण १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार सैन्याच्या फायटर जेटने मंगळवारी सकाळी ८ वाजता १५० लोक जमा झालेल्या ठिकाणी बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि २०-३० लहान मुलांचाही समावेश आहे.

एअर स्ट्राईकनंतर एक दीड तासाने एका हेलिकॉप्टरने गोळीबार केला. म्यानमार सरकारने या हल्ल्याचं वार्तांकन करण्यास मनाई केल्याने या हल्ल्यात नेमके किती मृत्यू झालेत याचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही.


म्यानमार सरकारने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. म्यानमारमधील लष्करी सरकारचा प्रवक्ता म्हणाला, “त्या गावात पिपल्स डिफेन्स फोर्सच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. ही सरकारविरोधी सशस्त्र संघटना आहे. २०२१ मध्ये लोकनियुक्त सरकार पाडल्यानंतर ही संघटना म्यानमारमध्ये आपले हातपाय पसरत आहे.” म्यानमार सैन्याने या मृत्यांना सरकारविरोधी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखांनी हा भयभीत करणारा हल्ला असल्याचं म्हटलं आहे.