गडहिंग्लज, ता. २८ : पाणी हे समतेचे वाहक आहे. ते सर्वांचे भले करते. खाच खळगे भरत जाते. त्याप्रमाणे आपणही समाजाला समतेची शिकवण देण्याचे काम केले पाहिजे, असे मत माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राज्यभाषा दिन व चंद्रकांत माळवदे लिखित गोवऱ्या आणि फुले या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जे. बी. बारदेस्कर प्रमुख पाहुणे होते. शिंदे म्हणाले , " ज्याठिकाणी सामान्यांच्या भावनांच्या मर्यादा येतात, तिथूनच असामान्य व्यक्तींच्या भावनांनी सुरुवात होते." बारदेस्कर यांनी भावी शिक्षक म्हणून अनेकांसमोर बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरले, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. एस. एम. रायकर, सुभाष देसाई, फादर ज्यो मंतेरो , ज्ञानराज चिघळीकर यांची भाषणे झाली. सुभाष धुमे यांनी स्वागत केले. कविता धायगुडे व सतीश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. डी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. सर्व शिक्षक, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.