अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२३ ची सुरुवात होईल. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीसमोर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची कसोटी लागणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी आयपीएल २०२३ चा उद्घाटन सोहळ पार पडेल. या सोहळ्यात अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी परफॉर्म करताना दिसणार आहेत.
हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या मोसमात गुजरात संघाला चॅम्पियन बनवले होते, तर सीएसकेची अवस्था वाईट होती. ज्यामुळे हा संघ नवव्या क्रमांकावर होता. गेल्या मोसमातील काही सामन्यांमध्ये सीएसके नेतृत्व रवींद्र जडेजाच्या हाती असले तरी धोनी आला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अशा स्थितीत धोनीचे या मोसमात विजयाने सुरुवात करण्याकडे लक्ष असेल, तर गुजरात संघालाही विजयाने सुरुवात करायला आवडेल.
चेन्नई संघाला त्यांची भूतकाळातील कामगिरी विसरून या वेळी नवीन सुरुवात करायला आवडेल. जरी संघाचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज आधीच बाहेर पडले असले, तरी एमएस धोनीकडे उत्कृष्ट खेळाडूंची फौज आहे. गुजरातविरुद्ध, चेन्नई संघ उत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू इच्छितो, ज्यामध्ये डेव्हॉन कॉनवे ऋतुराज गायकवाडसह डावाची सुरुवात करू शकतो.
मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, तर बेन स्टोक्स चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. दोघेही अष्टपैलू आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत. अंबाती रायुडू पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे, तर रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसेच कर्णधार एमएस धोनी स्वत: सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चा अंतिम सामना जिंकला होता.आता या संघाला आपला पहिला सामना जिंकून चांगली सुरुवात करायची आहे, परंतु यासाठी संघाला आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह जावे लागेल. या संघाकडून शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा सलामीला येऊ शकतात, तर केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर असू शकतो. कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर तर मॅथ्यू वेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.