भारतीय संघाने नागपूर कसोटीत वर्चस्व गाजवले. भारताने खेळपट्टी त्यांच्यासाठी पोषक बनवल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाकडून झाला. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताने धावांचा डोंगर उभारून या आरोपांचा पार चुराडा केला. रवींद्र जडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज पार बेजार झाले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने १ डाव व १३२ धावांनी विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
रोहित शर्माच्या १२० धावांनंतर रवींद्र जडेजा ( ७०) आणि अक्षर पटेल ( ८४) यांनी भारताला ४०० धावांचा टप्पा गाठून दिला. जडेजा व पटेल यांनी आठव्या विकेटसाठी २११ चेंडूंत ८८ धावा जोडल्या. त्यानंतर मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतले आणि नवव्या विकेटसाठी पटेलसह ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शमीने ४७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. अक्षर पटेल १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८४ धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ४०० धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फीने १२४ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची पडझड सुरूच राहिली. आर अश्विनने दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजाला माघारी पाठवले. त्यानंतर रवींद्र अश्विनने कसोटीतील नंबर वन फलंदाज मार्नस लाबुशेनला पायचीत केले. अश्विन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूने बाजी मारली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विन (९७) दुसऱ्या स्थानावर आला. अश्विनने ३१वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का देताना कर्णधार पॅट कमिन्सला बाद केले. यष्टिरक्षक केएस भरतने सुरेख झेल टिपला.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्स या LBW म्हणून घेतल्या आहेत आणि तो वेगळ्या क्लबमध्ये सहभागी झाला. भारताच्या अनिल कुंबळेने १५६ LBW विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर मुथय्या मुरलीधरन ( १५०), शेन वॉर्न ( १३८) व रंगना हेरथ ( १०८) यांचा क्रमांक येतो. मोहम्मद शमीने ९वी विकेट घेताना नॅथन लियॉनचा ( ८) त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहून कांगारूंची पडझड पाहत राहिला. जडेजाने स्मिथची विकेट घेतली आणि भारताने जल्लोष सुरू केला, परंतु तो No Ball ठरला.शमीने शेवटची विकेट घेतली आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावांत गडगडला. भारताने १ डाव १३२ धावांनी हा सामना