गडहिंग्लज : सीमाभागातील ८६५ गावांतील गरजू रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षाधिकारी मंगेश चिवटे यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमाभागातील लोकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा देणार असल्याचे जाहीर केले आहे, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे सीमाभागातील लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. परिणामी त्यांना उपचारासाठी मोठा खर्च सोसावा लागत आहे. त्यासाठी योजनेची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे. यावेळी राजेखान जमदार, विजय जाधव, सूरज गवळी, सचिन राऊत उपस्थित होते.