गडहिंग्लज, ता. २४ : कर्करोगाचे वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावेत म्हणून एसजीएम ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर व जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, आजरा ग्रामीण रुग्णालयात मोफत कर्करोग बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) सुरू केली आहे. या सेवेतून कर्करोगाची मोफत तपासणी केली जाईल, अशी माहिती ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटलचे अध्यक्ष उदय देशमुख व एसजीएमचेे ट्रस्टी डॉ. संजय चव्हाण यांनी दिली.
ते म्हणाले, 'ग्रामीण भागात कर्करोगांचे वाढते प्रमाण, कर्करोगाविषयीचे अज्ञान, गैरसमज, भीतीमुळे वेळीच निदान न झाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा पिडीत नागरिकांना मोफत कर्करोग तपासणीसाठी विशेष ओपीडीची सुविधा उपलब्ध आहे. दर मंगळवारी चंदगड ग्रामीण रुग्णालय, बुधवारी नेसरी ग्रामीण रुग्णालयात डॉ. अर्चना उगले, गुरुवारी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात डॉ. प्रीती पाटील आणि दर शुक्रवारी आजरा ग्रामीण रुग्णालयात डॉ. अर्चना उगले हे कर्करोग पिडीत रूग्णांची तपासणी करणार. याशिवाय ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत कर्करोग निदानासह अल्पदरात उपचारासाठी मदतही होणार असून, उपचारासाठी ओपीडी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.