ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर कोरले नाव; १९ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा

KolhapurLive

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेतील फायनल सामना रविवारी पार पडला. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेवर १९ धावांनी विजय मिळला. त्याचबरोबर सलग तिसऱ्यादा महिला टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला १५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद १३७ धावा करु शकला. त्यामुळे त्यांचे पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

१५७ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात खराब झाली. तझमिन ब्रिट्स १०(१७) काढून बाद झाली. त्यानंतर दुसरा मारिझान कॅप ११(११) आणि तिसरा धक्का कर्णधार सुने लुसच्या२(५) बाद होण्याने बसला. त्यानंतर लॉरा वोल्वार्ड आणि क्लो ट्रायॉनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. एलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. हीलीला २० चेंडूत १८ धावा करता आल्या. यामध्ये तीन चौकारांचा समावेश आहे.

यानंतर अॅशले गार्डनरने मुनीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. २१ चेंडूत २९ धावा करून गार्डनर क्लो ट्रायॉनच्या गोलंदजीवर झेलबाद झाली. आपल्या खेळीत तिने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. ग्रेस हॅरिस नऊ चेंडूत १० धावा करून बाद झाली आणि कर्णधार मेग लॅनिंगने ११ चेंडूत १० धावा केल्या. एलिस पेरी पाच चेंडूंत सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दरम्यान, बेथ मुनीने अर्धशतक झळकावले. दोन विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतके झळकावणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली.

अखेरच्या षटकात शबनीम इस्माईलने चौथ्या चेंडूवर एलिस पेरीला आणि पाचव्या चेंडूवर वेरेहमला बाद केले. तिला हॅट्ट्रिकची संधी होती, पण ताहिल मॅकग्राने शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. अशाप्रकारे शबनिमची हॅटट्रिक हुकली. बेथ मुनीने ५३ चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मारिजाने कॅप आणि शबनिम इस्माइलने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मलाबा आणि ट्रायॉन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.