महिला आयपीएल लिलावाबद्दल मोठी घोषणा; ४०९ खेळाडूंचा असणार समावेश, जाणून घ्या कोण, कोणत्या गटात? महिला प्रीमियर लीग २०२३ साठी, बीसीसीआयने लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने स्पर्धेच्या पहिल्या सत्रासाठी एकूण ४०९ खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राच्या लिलावाबाबत मोठी घोषणा केली आहे. आयपीएलच्या धर्तीवर यंदा ४ मार्च ते २६ मार्च दरम्यान मुंबईत महिला प्रीमियर लीग होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव कधी आणि कुठे होणार आणि लिलावासाठी किती खेळाडू निवडले गेले आहेत. त्याची माहितीही समोर आली आहे.
सोमवारी, बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगच्या पाच फ्रँचायझींना पाठवलेल्या मेलमध्ये, स्पर्धेसाठी मुंबईतील दोन स्टेडियम वापरण्यात येणार असल्याची पुष्टी करण्यात आली. यामध्ये ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम उपस्थित राहणार आहेत. संघांना जास्त प्रवास करावा लागू नये, म्हणूनच मुंबईच्या दोन स्टेडियमची निवड करण्यात आली आहे.बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी एकूण १५०० खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातून एकूण ४०९ खेळाडूंची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. १३ फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावात २४६ भारतीय आणि १६३ परदेशी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये २०२ कॅप्ड आणि १६३ अनकॅप्ड खेळाडू आहेत. एकूण ९० खेळाडू खरेदी केले जातील, ज्यामध्ये ६० भारतीय आणि ३० विदेशी खेळाडूंचा समावेश असेल. सर्व संघांच्या पथकात १७ खेळाडूंचा समावेश असेल.
दक्षिण आफ्रिकेत विश्वचषक जिंकणारे भारताचे अंडर-19 स्टार देखील या लिलावाचा भाग असतील. त्यात अनकॅप्ड पार्शवी चोप्रा, अर्चना देवी, तितास साधू, श्वेता सेहरावत आणि मन्नत कश्यप (सर्वांसाठी १० लाख रुपये मूळ किंमत) यांचा समावेश आहे.