बापू तमे छा गयो! अक्षर पटेलची तुफानी खेळी; तब्बल २२३ धावांची आघाडी घेत टीम इंडिया भक्कम स्थितीत

KolhapurLive
 
    भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला जात आहे. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस असून भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने कांगारूंना पाणी पाजत शानदार ८४ धावांची खेळी केली. त्याचे कसोटीतील पहिले मेडन शतक मात्र हुकले. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात १७७ धावांत आटोपला होता. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सात गडी गमावून ३२१ धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात ४०० धावांचा डोंगर उभारत २२३ धावांची भक्कम आघाडी घेतली असून ऑस्ट्रेलिया या सामन्यात पराभवाच्या दारात उभा आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

भारताने पहिल्या डावात ४०० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने अक्षर पटेलला त्रिफळाचीत करून भारताचा डाव संपवला. अक्षर पटेलने १७४ चेंडूत ८४ धावा केल्या. त्याच्या खेळीत १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अक्षरचे शतक नक्कीच हुकले, पण त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने २२३ धावांची आघाडी घेतली. नागपूरच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळत असून ही धार निर्णायक ठरू शकते.

 तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा रवींद्र जडेजा  आणि  अक्षर पटेल ही जोडी खेळपट्टीवर होते. दोघेही आज आपले शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी झाले. जडेजा १८५ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीने ताबडतोड फलंदाजी करत ३७ धावा केल्या. जर भारतीय संघाला पहिल्या डावात २०० धावांची आघाडी मिळवता आली तर तो ऑस्ट्रेलियालाही डावाच्या फरकाने पराभूत करू शकतो. अशी शक्यता सकाळी रवी शास्त्री यांनी व्यक्त केली होती आणि तसेच करत टीम इंडियाने २२३ धावांची भक्कम आघाडी घेतली. मात्र, आता लवकरात लवकर कांगारूंना बाद करणे आवश्यक आहे.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. ४९ धावा करणारा मार्नस लबुशेन संघाचा सर्वोत्कृष्ट स्कोअरर ठरला. स्टीव्ह स्मिथने ३७ आणि अ‍ॅलेक्स कॅरीने ३६ धावा केल्या. भारताकडून जडेजाने पाच आणि अश्विनने तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसअखेर भारताने सात गडी गमावून ३२१ धावा केल्या होत्या. भारतीय कर्णधार रोहित शर्मा १२० धावांची शतकी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याचवेळी रवींद्र जडेजा ६६ आणि अक्षर पटेल ५२ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने ५ विकेट्स घेतल्या.

       

‌‌‌‌