कोट्यवधींचे कर्ज वसूल होण्याची शक्यता कमीच?
“देशातील सुमारे 7 लाख कंपन्यांविरोधात कर्जवसुलीचे खटले सुरू असून त्यातील बहुतांश कंपन्या एक तर बंद पडल्या आहेत किंवा ‘गायब’ झाल्या आहेत. म्हणजे म्हणायला कर्जवसुलीची प्रक्रिया कागदोपत्री सुरू आहे, पण या ७ लाख कंपन्यांकडील कोटय़वधींचे थकीत कर्ज वसूल होण्याची शक्यता फार कमी आहे”, असं अग्रलेखात नमूद केलं आहे.
“..तर कर्जवसुली हवेतली तलवारबाजी”
“सर्व कंपन्यांविरोधात कर्जवसुलीचे खटले सुरू आहेत. पण ज्या सात लाख कंपन्यांविरोधात हे खटले सुरू आहेत त्यातील बहुतांश बंद पडल्या आहेत, दिवाळखोर झाल्या आहेत किंवा ‘गायब’ झाल्या आहेत. त्यात अशा व्यवसाय गुंडाळून पोबारा केलेल्या किती कंपन्या आहेत, त्यांचे मालक कोण आहेत याची अधिकृत माहिती खुद्द कंपनी व्यवहार मंत्रालयाकडेच नाही. हे जर खरे असेल तर मग हे कर्जवसुलीचे खटले म्हणजे हवेतली तलवारबाजीच ठरते. एक सरकारी सोपस्कार म्हणून ही प्रक्रिया सुरू आहे का?” असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
“…तरीही आत्मनिर्भरतेचे ढोल पिटले जातायत” गेल्या पाच वर्षांत असंख्य व्यावसायिक, उद्योगपतींनी देशाची लाखो कोटी रुपयांची कर्जे बुडवली आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन ही मंडळी गायब झाली आहेत. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या अशा काही मोजक्या कर्जबुडव्यांची प्रकरणे समोर आली असली तरी समोर न आलेले कर्जबुडवे ‘मोदी-चोक्सी-मल्ल्या’ शेकडो आहेत आणि त्यांनी बुडविलेल्या कर्जाची रक्कमही प्रचंड आहे. कर्जबुडव्या कंपन्यांपासून बुडीत कर्जापर्यंत सगळे काही लाखांत आणि कोटय़वधींमध्येच आहे. तरीही विकास आणि आत्मनिर्भरतेचे ढोल पिटले जात आहेत”, असा आक्षेप ठाकरे गटाकडून घेण्यात आला आहे.