Jitendra Awhad : अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर आमदारकीच्या राजीनाम्याबाबत जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

KolhapurLive

ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेतअटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाडांनी आमदारकीचा राजीनाम देणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला कळव्याच्या, “मुंब्राच्या काही पत्रकारांनी सांगितलं. तुम्ही जर तो व्हिडिओ व्यवस्थि बघितला तर संपूर्ण गर्दीत एक स्त्री चालत येत होती. मी गाडीला चिकटून जात असताना त्या बाई समोरून येत होत्या, मी जर त्यांना बाजूला केलं नसतं. तर त्या माझ्या अंगावरच आपटल्या असत्या. त्या जर अंगावर आपटल्या असत्या, तर मला माझ्या रक्षणाचा कुठलीहीसंधी मिळाली नसती. मग त्यांनी आरोप केला असता की जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले. बरं झालं देवाने मला बुद्धी दिली मी त्यांना हलक्या हाताने बाजूला केलं आणि हे पण शब्द आहेत एवढ्या गर्दीत कशाला जाता बाजूला व्हा. म्हणजे इतका घाणेरडा, किळसवाण्या प्रकाराची योजना आखायची आणि त्याला वरून आशीर्वाद मिळवायचे. हे म्हणजे कहर आहे, इतकं बदनामीचं षडयंत्र रचणं आणि एकाला राजकीय व सामाजिक जीवनातून उध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचायचं, यामध्ये कसला आनंद आहे?'
याचबरोबर “मला परवाही अटक केली यावर न्यायालयाने जो निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी तुम्ही अटक करतानाच्या प्रक्रियेतच चुकलेले आहात, असं न्यायालयानेच नमूद केलं आहे. मी त्या ऑर्डरची प्रतही तुम्हाला देईन. न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही अटकच करू शकत नाही. हे काय सुरू आहे? पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याच्या अगोदर तो व्हिडिओ तरी बघायला पाहिजे होता. मी काय बोललो ते पूर्ण रेकॉर्ड झालेलं आहे. ती स्वत:म्हणते की माझा अपमान झाला, मला राग आला. कलम ३५४ कधी लागतो याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्देश आहेत. काही न वाचता थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. केवळ दबावापोटी केलं जातय, पण वरून नेमकं कोण दबाव टाकतं हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. हवालदारापासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत कोणालाही विचारलं तरी ते केवळ वरनं दबाव असल्याचं सांगतात. म्हणजे पोलीसच हे मान्य करत आहेत की आम्हाला कायदा बाजूला ठेवावा लागतो. महाराष्ट्रात असं कधी पाहीलं नव्हतं.” असंही आव्हाड म्हणाले.