राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली. त्यानंतर आज ( १२ नोव्हेंबर ) आव्हाडांना कोर्टात हजर करण्यात आलं असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी कोर्टाने आव्हाडांना जामीन मंजूर केला आहे.
'हर हर महादेव’ या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी ७ नोव्हेंबरला विवियाना सिनेमागृहात आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केलं. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. याच कारणामुळे ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी जितेंद्र आव्हाड आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अटक केली होती. आज आव्हाडांना कार्यकर्त्यांसह सकाळी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा कोर्टाने आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनीजामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या १२ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.