गडहिंग्लज ता.१२ : हनुमंतवाडी ( ता.गडहिंग्लज ) येथील किरकोळ कारणावरून नेसरी येथील सहायक फौजदार तानाजी विचारे व उपसरपंच दादोसो विचारे यांच्यात ग्रामपंचायत कार्यालयात लाथाबुक्क्यांनी मारामारी झाली. याप्रकरणी दोघांवर ही परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
उपसरपंच विचारे यांच्या तक्रारीनुसार, काल (ता. ११ ) ग्रामसभा होती. ग्रामस्थ अजून जमले नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयात इतर सदस्य व ग्रामसेवक चर्चा करीत बसलो होतो. त्यावेळी पोलीस विचारे या ठिकाणी येऊन चार वर्षे झाली. तुम्हाला ग्रामपंचायत कळली नाही काय, असे म्हणून शिवीगाळ करू लागले, शिवी देऊ नका, असे सांगत असताना, तू कोण मला विचारणार, असे म्हणत ते अंगावर धावून आले व लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. दरम्यान पोलीस विचारे यांच्या फर्यादीनुसार शेजारी राहणारे पांडुरंग पताडे यांच्याविरोधात भावाने गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांच्या आदेशाने या तक्रारीची ग्रामसेवकाकडून चौकशी सुरू आहे. चौकशीत वेळ लागत असल्याने ग्रामसेवक विरुद्ध त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रारी ही दिली आहे. दरम्यान, माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेलो असताना उपसरपंच विचारे यांनी तू फार शहाणा आहेस तू ग्रामपंचायतला निघून जा, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. माझ्या कामासाठी आलो आहे, असे सांगत असताना ते अंगावर धावून आले व मारहाण केली आणि यापुढे ग्रामपंचायतीत आलास तर मारण्याची धमकी दिली.