प्रतापगडाच्या पायथ्याला अफझल खान कबर परिसरात आज सलग चौथ्या दिवशी महसूल विभाग व वन विभागाच्या संयुक्तिक कारवाईमध्ये संपूर्ण परिसरातील पाडलेल्या बांधकामांचे डबर, माती, पत्रे व लोखंड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अफजलखान कबरी व्यतिरिक्त सापडलेल्या कबरी बाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी शिवप्रेमींकडून शासनाकडे करण्यात आली. दरम्यान प्रतापगडावर पुन्हा बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
अद्याप संपुर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्त आहे. कबर परीसरात डबर, माती ,मलबा हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेली कारवाई पूर्ण होत असल्याने शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ज्या चौथऱ्यावर अफझल खान कबर आहे तेथील सुमारे चार फूट चौथरा वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने हा चौथरा मोकळा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. आज अफझल खान व सय्यद बंडा यांच्या कबरी वरील चादर व मोरपीस हटवून खऱ्या अर्थाने हा परिसर अतिक्रमण व उदात्तीकरण यापासून मुक्त करण्यात आला आहे.
कबरीवरील मजबूत बांधकाम पाडून कबर उघडे करुन चार दिवस उलटले तरी कबर जवळ अद्याप मोठ्या प्रमाणात अत्तराचा घमघमाट कमी झालेला दिसत नाही. संपुर्ण परिसर कायमस्वरूपी अतिक्रमण विरहीत व उदात्तीकरण होऊ नये यासाठी शासनाने या परिसरातील सुंदर असे स्मारक, बगीचा व यांची योग्य देखभाल ठेवण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे
महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर सध्या सुरू असलेले जमावबंदीचे कलम १४४ मागे घ्यावे व प्रतापगडावर पर्यटकांना जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने करण्यात आली आहे. समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, स्वप्नील भिलारे, प्रथमेश ढोणे, राहुल पवार, तुकाराम तुपे, पंकज शिंदे, सुमित भोसले, विवेक भोसले आदींनी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले.