गडहिंग्लज(करंबळी) : जनाई मेडिकल करंबळी चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व डॉक्टर शुभांगी निकम मॅडम यांचे स्त्री व स्त्रियांचे आरोग्य या विषयाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सौ वर्षा अनुप पाटील मॅडम होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून झाले. त्यानंतर प्रमुख वक्त्या डॉक्टर सौ.शुभांगी निकम मॅडम यांचा सत्कार सौ.जनाबाई यादव यांनी तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ वर्षा पाटील मॅडम यांचा सत्कार सौ.गंगुबाई पन्हाळकर मॅडम यांनी केला. तसेच सुप्रिया भांदुगरे हिचा सत्कार मा. सौ वर्षा पाटील मॅडम यांनी केला.
डॉक्टर शुभांगी निकम मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या, प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता घरातील सर्वांचा विचार करते पण स्वतः मात्र पोषक आहारापासून वंचित राहते. शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्य म्हणजे सुदृढता. घरातील स्त्री सदृढ असेल तर घरदार सुदृढ राहते. उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे आणि तो आपण प्राणपणाने जपला पाहिजे. शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आहार विहार याचबरोबर व्यायाम व योगासने करणे गरजेचे आहे. सौंदर्याची परिकल्पना स्पष्ट करताना मॅडम म्हणाल्या, प्रत्येक व्यक्ती सुंदर असते. रंग रूपापेक्षा मनाचे सौंदर्य खूप महत्त्वाचे आहे. निरोगी शरीर व निर्मळ मन यांचा उजळपणा चेहऱ्यावर दिसतो. त्यामुळे जाहिरातींना बळी न पडता शरीर व मनाचे आरोग्य जपावे असा सल्ला मॅडम यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. वर्षा अनुप पाटील मॅडम म्हणाल्या, डॉ. निकम मॅडम यांनी दिलेला आरोग्याचा कानमंत्र जपून प्रत्येक स्त्री ने निरामय जीवन जगावे तसेच स्त्रियांच्या कसल्याही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीन,स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी सदैव तयार असल्याचे सांगून जनाई मेडिकलच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणानंतर हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा सुतार यांनी ,पाहुण्यांचा परिचय सौ. गंगुबाई पन्हाळकर यांनी तसेच आभार सौ. उमा सुतार यांनी मानले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जनाई मेडिकलच्या सौ.सोनाली यादव व सौ जनाबाई यादव यांनी केले.सदरचा कार्यक्रम गावातील बाळनाथ सभागृहात पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.