गोडसाखर उर्जित अवस्थेत आणून सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच आमची प्राथमिकता......

KolhapurLive



      
शेतकरी सभासदांनीच घडविला ऐतिहासिक विजय.....
          
आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया.......
     
कै. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद, हितचिंतक, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी यांचे मी मनापासून आभार मानतो. प्रचंड विजय छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून देऊन आपण सर्वांनी जे मतदान केले व विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मनःपूर्वक मी आभार मानतो. कारखान्याचे माजी चेअरमन व आघाडीप्रमुख डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांची जबाबदारी वाढली आहे. कारण, ही निवडणूक हा कारखाना बंद पाडणारे आणि हा कारखाना चालू करणारे, या विषयाभोवतीच केंद्रित झाली होती. आणि सर्व सभासदांनी कारखाना चालू करणाऱ्यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे ही जबाबदारी अधिकपटीने वाढली आहे. आता डॉ. शहापूरकर,  प्रकाश चव्हाण आणि सर्व संचालक मंडळ हा जो काय निर्णय घेतील. म्हणजेच स्वबळावर चालवणे, शासनाच्या निर्णयाप्रमाणे चालवण्यास देणे याबाबत त्यांची जी भूमिका असेल त्यांच्या पाठीमागे मी ठामपणे उभा राहीन. आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसुद्धा यामध्ये सकारात्मक सहकार्य करील.    
          
या निवडणुकीमध्ये काही मंडळींनी प्रचार फारच खालच्या पातळीला नेलेला होता. परंतु; आम्ही त्यांना उत्तर देण्याच्या नादाला न लागता, कारखाना आम्ही कसा सुरू करणार आहोत आणि यापूर्वीच्या ब्रिस्क कंपनीचा अनुभव आम्ही कथाकथन करीत होतो. अलीकडच्या  काळात कामगारांना २० महिन्याचा पगार नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांची देय असलेली देणी दिलेली नाहीत. सभासदांना हक्काची साखर नाही. तसेच,  तोडणी -वाहतूकीच्या निमित्ताने व्यवसाय नसलेल्या तरुणांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. अशा अनेक समस्या या कारखान्यांमध्ये निर्माण झालेल्या होत्या. त्या दूर करणे ही प्राथमिक आणि महत्त्वाची जबाबदारी या नवनिर्वाचित संचालक मंडळाची आहे. या सगळ्यात शेतकरी सभासदाने दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरविण्याची शक्ती श्री.  काळभैरव देवाने आम्हाला द्यावी, एवढीच परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो.
           
*पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सर्व नेतेमंडळी,  प्रमुख कार्यकर्ते, कार्यकर्ते, हितचिंतक या सर्वांनीच श्री. छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या ऐतिहासिक विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी केले. त्या सर्वांनाच मनापासून सलाम करतो आणि सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
=====================