राहुलजी गांधी, तुमच्या आज्जीने सावरकरांचं पत्र वाचलं नव्हतं का? सावरकर वाद पेटला, हिंदू महासंघ आक्रमक

KolhapurLive

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आजीने म्हणजेच इंदिरा गांधी यांनी सावरकरांना (Sawarkar) देणगी दिली होती. त्यांनी सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दल बोलताना पत्रात धाडसी असा उल्लेख केला, तो काय कुणाच्या दबावाखाली केला होता का? राहुल गांधींनी त्यांच्या आजीने सावरकरांना लिहिलेलं हे पत्र वाचलं नव्हतं का, असा सवाल आनंद दवे यांनी केलाय.

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटलाय. वीर सावरकर हे इंग्रजांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते, असं वक्तव्य आधी राहुल गांधी यांनी वाशिममध्ये केलं. त्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सणकून टीका केली. महाराष्ट्रात सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं. तर महाराष्ट्राची जनता याला उत्तर देईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रभर उमटत आहेत. त्यातच राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र माझ्याकडे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. इंग्रजीत असलेल्या या पत्रात, सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ… असं लिहिल्याचं राहुल गांधी म्हणाले. अलोका येथील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक कागदपत्र दाखवत हेच ते सावरकरांचे ब्रिटिशांना लिहिलेले पत्र असल्याचा दावा केला.

देवेंद्र फडणवीस यांना वाचायचं असेल तर हे पत्र वाचावं. इंग्रजांना सावरकरांनी मदत केली होती, असा दावा राहुल गांधी यांनी पुन्हा केला. त्यावरून आनंद दवे यांनी आक्रमक भूमिका मांडली.