धाराशिव पोलिसांची राज्यात चर्चा, टेक्नोलॉजीचा परफेक्ट वापर! काय आहे ई मुद्देमाल उपक्रम? QR कोड स्कॅन करताच…

KolhapurLive

नाडी ओखळत आपल्या क्षेत्रात त्याचा वापर करुन घेतला तर गोष्टी किती सोप्या होतात, हे धाराशिवच्या (Dharashiv) पोलिसांनी दाखवून दिलंय. धाराशिव शहरातील दोन पोलीस ठाण्यांनी टेक्नोलॉजीचा वापर तपासकामासाठी असा काही केला की काही सेकंदात संबंधित केसची सर्वच माहिती समोर येते. ना फायलींची शोधाशोध, ना सुरक्षेची भीती. धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ई मुद्देमाल हा उपक्रम राबवला जातोय. ढोकी व आनंद नगर पोलीस ठाण्यात सुसज्ज यंत्रणा तयार केली आहे. या उपक्रमामुळे पोलिसांना तपासात मदत होत असून गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढत आहे. गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल एका बॉक्समध्ये ठेवण्यात आला. त्याला गुन्ह्याच्या नंबरसह डिजिटल बार कोडींग केले . त्यामुळे अवघ्या काही मिनिटात क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मुद्देमाल सापडतो. शिवाय तो सुरक्षित राहतो. तांत्रिक दृष्ट्या विश्लेषण करुन तपास केल्यानंतर हा महत्वाचा पुरावा कोर्टात सुनावणीवेळी सादर करता येतो.

क्यूआर कोड दिल्याने तो मोबाईलद्वारे स्कॅन केल्यानंतर तो कोणत्या बॉक्समध्ये ठेवला आहे व त्यात जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन असते त्यामुळे तो शोधण्याचा वेळ वाचतो. सर्वसाधारणपणे गुन्ह्यात वापरलेली व तपासात जप्त केलेल्या वस्तू पोलीस ठाण्यात अस्ताव्यस्त पडलेल्या असतात मात्र धाराशिव जिल्ह्यात मात्र हे चित्र बदलले असुन त्यात एक सुसुत्रा आली आहे.