चंदगड, ता. १२ : गडहिंग्लज- चंदगड मार्गावर अडकूर नजीक मोरीचे बांधकाम सुरु आहे. रस्ता रुंदीकरण आणि मोरीमुळे पाण्याचा प्रवाह शेतात घुसून नुकसान होणार आहे. बांधकाम विभागाने शेताच्या संरक्षणासाठी कठडा बांधावा, अशी मागणी शारदा आर्दाळकर यांनी केली आहे. कठडा न बांधल्यास काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
आर्दाळकर यांच्या शेताला लागूनच मोरी वजा पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्याची दिशा बदलल्यामुळे ओढ्याचा प्रवाह शेतात घुसण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या ओढ्याला मोठा पूर येतो. त्यावेळी हे पाणी शेतात घुसल्यास पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. पाण्याच्या प्रवाहाने शेतीही वाहून जाण्याची शक्यता आहे. उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतीचे नुकसान झाल्यास कुटुंबाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन शेताच्या संरक्षणासाठी कठडा बांधावा, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकामसह सर्व प्रमुख विभागांना निवेदन दिले आहे.