जवळपास ३० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा जळीतकांड आणि त्यानंतरच्या दंगलींबाबत अजूनही चर्चा घडत असतात. या मुद्द्यावरून आजवर मोठं राजकारणही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरून चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गोध्रा जळीतकांडाविषयी एक गंभीर दावा केला आहे. तसेच, भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन त्यांनी मुस्लीम समाजाला केलं आहे. त्यामुळे यातून पुन्हा एकदा धार्मिक मुद्द्यावर राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“त्या रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला”
“गोध्रा दंगलीबाबत मी भाजपावाल्यांना आव्हान दिलं होतं की माझ्याबरोबर बसा. खुलेआम. याचं कारण त्या रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. नाही असं नाही. पण तो बाहेरून जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा. पेट्रोल टाका, डिझेल टाका, काहीही टाका. तो बाहेरून पेटत नाही. तसाच्या तसा राहातो. काय पेंट केलाय कुणाला माहिती. तो पेटतच नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो”, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
“आतून पेटवला म्हणजे जो कुणी आत बसला आहे त्यानंच पेटवला असेल. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे फसवेगिरीचं फार मोठं षडयंत्र झालं आहे”, असा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.