पारगड ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण

KolhapurLive


चंदगड, ता.ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेली नळ पाणी योजना प्रशासनाच्या बेपरवाईमुळे रखाडल्याच्या निषेधार्थ आज पासून ग्रामस्थांनी येथे पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने त्याच्या तीव्र भावना आहेत.

     पारगड साठी मिरवेल (ता. चंदगड) गावच्या हद्दीतून नळ पाणी योजना राबवण्याचा ग्रामस्थांचा आग्रह होता. त्यासाठी अटीशी अधीन राहून वन खात्याकडून परवानगी ही मिळाली होती. परंतु त्याला वर्ष उलटले तरी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून काहीच कार्यवाही झाली नाही. या गावासाठी मिरवल वर आधारित जल जीवन मिशन योजना मंजूर झाली असून त्याला निधी मिळावा, अशी मागणी या विभागाकडे केली होती. संबंधित अधिकाऱ्यांकडून अंदाजपत्रकही सादर केली होते. या जागेचे चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले. भूजलवैज्ञानिकानी तपासणीही केली. परंतु, अधिकाऱ्यांकडून आदेश काढण्यात दिरंगाई झाल्याने ही योजना रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

      दरम्यान, आज ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता कांबळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन उद्या  वर्कऑर्डर काढण्यात येईल, आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली. परंतु 35 वर्ष जे प्रश्न प्रशासन ढिम्म आहे ते एक दिवस काय काम करणार ? प्रथम काम सुरू करावे मग आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. रघुवीर शेलार, सरपंच संतोष पवार,सुरेश मालुसरे, संदीप कांबळे, जयालक्ष्मी मालुसरे, कल्पना घोरपडे, मरावती कांबळे, राजश्री कांबळे आधी सहभागी झाले आहेत.