बुलेटवर स्वार नऊवारीतील तरुणी, डोळ्यांवर गॉगल आणि डोक्यावर फेटा अशी बाईक रॅली या शोभायात्रांमधल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असते. दरवर्षी अशा प्रकारे रॅली काढली जाते. यंदाही या शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पारंपरिक वेशभूषा करून तरुण मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांचा सहभाग आणि ठाणेकरांचा उत्साह!
ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यामुळे ठाणेकरांचा उत्साह अधिकच वाढला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिरातही त्यांनी दर्शन घेतलं. “मी गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या महाराष्ट्रवासीयांना शुभेच्छा देतो. सगळ्यांना नवीन वर्ष सुखा-समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो. करोनामुळे आपल्या सणांवर निर्बंध आणि मर्यादा होत्या. पण आपल्या सरकारने ते उठवल्यानंतर गोविंदा, दहीहंडी, गणपती, नवरात्रौत्सव, दिवाळी असे सगळे सण महाराष्ट्राच्या जनतेनं जल्लोषात पार पाडले. आजचा गुढी पाडवाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जनता सहभागी झाली आहे. हजारो ठाणेकर नागरिकही सहभागी झाले आहेत. अनेक चित्ररथ यात्रेत आहेत. यापूर्वीच्या शोभायात्रेपेक्षा दुप्पट उत्साह नागरिकांमध्ये दिसतोय”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
“मी गेली अनेक वर्षं या शोभायात्रेत न चुकता सहभागी होतो. यावर्षी मुख्यमंत्री म्हणून या शोभायात्रेत सहभागी होण्याचा मला आनंद आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
नव्या वर्षाचा संकल्प काय?
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आणि सरकारचा नव्या वर्षाचा संकल्पही सांगितला. “सरकारचा नव्या वर्षाचा संकल्प आपण अर्थसंकल्पात पाहिलेला आहे. या राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. सर्व घटकांना न्याय देण्याचं काम अर्थसंकल्पात केलं आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरुणाई अशा सगळ्यांचा विचार आपण केला आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.