इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) ने गुरुवारी पुरूष टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ साठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली. या पुरस्कारासाठी एकूण ४ खेळाडूंचे नामांकन करण्यात आले आहे. त्यात एका भारतीयाचा खेळाडूचा समावेश आहे. या चार खेळाडूंपैकी इतर तीन खेळाडू झिम्बाब्वे, इंग्लंड आणि पाकिस्तानचे आहेत. भारतासाठी या पुरस्कारासाठी मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवच्या नावाचा समावेश आहे, तर इतर तीन खेळाडू सिकंदर रझा, सॅम करण आणि मोहम्मद रिझवान आहेत.
सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष चांगले गेले. सूर्याच्या बॅटने यावर्षी ३१ सामन्यांमध्ये ४६.५६ च्या सरासरीने आणि १८७.४३ च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने ११६४ धावा केल्या. या वर्षी सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज होता. या वर्षी सूर्याच्या बॅटमधून एकूण ६८ षटकार आले आहेत. तो या यादीत इतर खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे.
या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवची बॅटही जबरदस्त तळपली, त्याने ६ सामन्यात ६० च्या सरासरीने धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १९० च्या आसपास होता. सूर्याने विश्वचषकात तीन अर्धशतकेही झळकावली होती.
२०२२ मधील इतर खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा टी-२० विश्वचषकातील मालिकावीर आणि अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. करणने यावर्षी १० सामन्यात ६७ धावा केल्या, तर २५ बळी घेतले. यापैकी त्याने टी-२० वर्ल्ड कपमध्ये १३ विकेट घेतल्या.
झिम्बाब्वेच्या सिकंदर रझासाठीही हे वर्ष खूप चांगले गेले. या खेळाडूने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जगभरात प्रसिद्धी मिळवली. रझाने २४ सामन्यात ७३५ धावा केल्या आणि २५ बळीही घेतले. त्यामुळेच त्याला यंदा आयपीएलचा लिलावात मोठी बोली लागली आहे. आयपीएलच्या मिनी लिलावात त्याला पंजाब किंग्जने विकत घेतले.
मोहम्मद रिझवानचे टी-२० क्रिकेटमध्ये सलग दुसरे वर्ष चांगले होते. गतवर्षी विक्रमी १३२६ धावा करणाऱ्या या यष्टीरक्षक फलंदाजाने २०२२ मध्ये ९९६ धावा केल्या. सलग दुसऱ्यांदा १००० धावांचा टप्पा गाठण्यापासून त्याला फक्त ४ धावा कमी आहेत. यावर्षी रिझवानच्या बॅटमधून १० अर्धशतके झळकली.