गुजरातमधील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पोकळ आश्‍वासने अन् रेवडी…”

KolhapurLive

गुजरातमध्ये भाजपाचा विजय निश्चित झाला आहे. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय मिळवला आहे. दरम्यान गुजरातमधील भाजपाच्या या दणदणीत विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. पोकळ आश्‍वासने आणि सांप्रदायिक राजकारण करणाऱ्यांना गुजरातने नाकारले आहे, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी या विजयानंतर गुजरातच्या जनतेचे आभारही मानले.
काय म्हणाले अमित शाह?
“गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले”, असं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.
विरोधकांवरही साधला निशाणा
“पोकळ आश्‍वासने, रेवडी वाटप आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले आहे. तसेच विकासाचे राजकारण करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला आहे. या विजयानंतर महिला, तरुण, शेतकरी पुन्हा एकदा भाजपाच्या पाठिशी आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे”, असेही ते म्हणाले.
गुजरातमधील जनतेचे मानले आभार
या विजयानंतर त्यांनी गुजरातच्या जनतेचीही आभार मानले. “या ऐतिहासिक विजयाबद्दल मी गुजरातच्या जनतेला आभार मानतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, आणि गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.