शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहेत. महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या एका विधानामुळे संभाजी भिडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणानंतर संभाजी भिडे यांनी सावध पवित्रा घेतला असून, प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. शिवप्रतिष्ठानकडून सांगलीत दुचाकी रॅलीला परवानगी नाकारण्यात आली. मात्र तरीही काही मोजक्या कार्यकर्त्यांसहित ते दुचाकींवरुन पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी विनंती करुनही ते काही न बोलता निघून गेले.
संभाजी भिडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. मात्र यावेळी त्यांनी पत्रकारांना मज्जाव केला, तसंच प्रतिक्रिया न देताच निघून गेले.
संभाजी भिडे यांनी जिल्हा प्रशासनाला १३ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. टिपू सुलतानची जयंती कोणत्याही परिस्थितीत साजरी केली जाऊ नये. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्यासाठी परवानगी देऊ नये. जर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली नाही तर आम्ही जयंती साजरी होऊ देणार नाही असा इशारा शिवप्रतिष्ठानने दिला आहे. दरम्यान निवेदन किंवा मागण्यांबाबत संभाजी भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधणं टाळलं. बाहेर आल्यानंतर ते काहीही न बोलताच निघून गेले.
बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, ‘तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?’ यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही,” असं वक्तव्य भिडे यांनी केलं. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.