राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी संजय पवारांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ‘बाप हा शेवटी बापच असतो’ असं म्हणत जहरी टीका केली. ते सोमवारी (२१ नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये बोलत होते.
संजय पवार म्हणाले, “आम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केलेला नाही आणि करणार नाही. छत्रपती शिवराय आमचे आदर्श आहेत, आमचे दैवत आहेत. भाजपाचे काही मंडळी जाणीवपूर्वक वारंवार छत्रपती शिवरायांचा अपमान करत आहेत.”
“बाप हा शेवटी बापच असतो”
“भविष्यात भगतसिंह कोश्यारी किंवा सुधांशू त्रिवेदी कोल्हापुरात आले, तर कोल्हापूर बंदचं आम्ही स्वागत करू. बाप हा शेवटी बापच असतो. छोटा बाप किंवा मोठा बाप, जुना बाप किंवा नवा बाप ही आमची संकल्पना नाही. त्यांची अशी काही संकल्पना असेल तर माहिती नाही,” असं म्हणत संजय पवारांनी राज्यपाल आणि भाजपावर निशाणा साधला.
“शिवाजी महाराजांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येत नाही”
दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीही टीका केली. ते म्हणाले, “भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांचा राज्यपालांनी तीन ते चारवेळा एकेरी उल्लेख केला. छत्रपतींना शिवाजी म्हणतात आणि शिवाजी जुने झाले असंही सांगतात. या राज्यपालांना कळालं पाहिजे की, शिवविचार कधी जुना होत नाही.
“माझी भाजपाच्या सर्व केंद्रीय नेत्यांना विनंती आहे”
“माझी भाजपाच्या सर्व केंद्रीय नेत्यांना विनंती आहे की, ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, राज्य काय आहे हे ज्याला कळत नाही, अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही. राज्यपालपदावर या मराठी मातीतील माणूसच ठेवावा,” अशी मागणी संजय गायकवाडांनी केली.